

नवरात्र हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे, जो वर्षातून चार वेळा येतो. यापैकी 'शारदीय नवरात्र' हा सर्वात जास्त लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणात साजरा होणारा उत्सव आहे. आदिशक्ती देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा या नऊ दिवसांत केली जाते. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय आणि स्त्रीशक्तीचा गौरव दर्शवतो. २०२५ मध्ये शारदीय नवरात्र कधी सुरू होत आहे, याचे शुभ मुहूर्त काय आहेत आणि या नऊ दिवसांचे महत्त्व काय आहे, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
दाते पंचांगानुसार, 2025 चा शारदीय नवरात्रोत्सव 22 सप्टेंबर, सोमवारपासून सुरू होत आहे. हा उत्सव , 2 ऑक्टोबर गुरुवारपर्यंत चालणार आहे.
नवरात्रीची सुरुवात (घटस्थापना): २२ सप्टेंबर, सोमवार
नवरात्रीची समाप्ती: 2 ऑक्टोबर गुरुवार
दसरा (विजयादशमी): ३ ऑक्टोबर
घटस्थापना (कलश स्थापना) शुभ मुहूर्त: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करणे अत्यंत शुभ मानले जाते. यावर्षी घटस्थापनेसाठीचा शुभ मुहूर्त पुढीलप्रमाणे आहे:
सकाळी: 8 AM ते 12 PM
दुपारी: 3 PM ते 4 PM
या मुहूर्तावर घटस्थापना केल्यास देवीची कृपा प्राप्त होते असे मानले जाते.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. प्रत्येक दिवसाचे एक विशेष महत्त्व आहे आणि प्रत्येक दिवशी एका विशिष्ट देवीची पूजा केली जाते.
प्रतिपदा (२२ सप्टेंबर): घटस्थापना आणि शैलपुत्री देवीची पूजा.
द्वितीया (२३ सप्टेंबर): ब्रह्मचारिणी देवीची पूजा.
तृतीया (२४,२५ सप्टेंबर): चंद्रघंटा देवीची पूजा.
चतुर्थी (२६ सप्टेंबर): कुष्मांडा देवीची पूजा.
पंचमी (२७ सप्टेंबर): स्कंदमाता देवीची पूजा.
षष्ठी (२८ सप्टेंबर): कात्यायनी देवीची पूजा.
सप्तमी (२९ सप्टेंबर): कालरात्री देवीची पूजा.
अष्टमी (३०सप्टेंबर): महागौरी देवीची पूजा. या दिवशी कुमारिकांची पूजा (कन्या पूजन) केली जाते.
नवमी (१ ऑक्टोबर): सिद्धीदात्री देवीची पूजा. यानंतर हवन आणि पूर्णाहुती केली जाते.
दसरा (२ ऑक्टोबर): विजयादशमीचा दिवस हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे.
नवरात्रीच्या उत्सवामागे महिषासुराच्या वधाची पौराणिक कथा आहे. महिषासुर नावाच्या राक्षसाला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले होते की त्याचा वध कोणताही देव किंवा पुरुष करू शकणार नाही. या वरदानाचा गैरवापर करून महिषासुराने स्वर्ग आणि पृथ्वीवर हाहाकार माजवला. तेव्हा सर्व देवांनी आदिशक्तीला आवाहन केले. आदिशक्तीने देवी दुर्गेचे रूप धारण केले. नऊ दिवस महिषासुराशी युद्ध करून दहाव्या दिवशी देवीने त्याचा वध केला. हा दिवस 'विजयादशमी' म्हणून साजरा केला जातो. या कथेवरून असे दिसून येते की, वाईटाचा कितीही प्रभाव असला तरी चांगल्याचाच विजय होतो.
नवरात्री हा केवळ धार्मिक सण नाही, तर तो सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक आहे. या दिवसांत गरबा आणि दांडिया रासचे आयोजन केले जाते, जिथे लोक एकत्र येऊन आनंद साजरा करतात. अनेक ठिकाणी देवीच्या मूर्तींची स्थापना केली जाते आणि सार्वजनिक मंडपांत पूजा केली जाते. हा सण स्त्रीशक्तीचा आदर आणि सन्मान करण्याचा संदेश देतो.